Bhandardara Dam : भंडारदरा धरण इतके भरले, पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhandardara Dam : भंडारदरा पाणलोटात सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने आदिवासी बांधवांचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. ब्रिटीश कालीन भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ होऊन भंडारदरा धरण ६० टक्के भरले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे अहमदनगरची चेरापुंजी समजली जाते. मागील गुरुवार पासून सुरु झालेल्या पावसाने थोडासुद्धा विसावा न घेता कोसळत आहे. त्यामुळे भात आवणीला जरी वेग आला असला, तरी लहान रोपे असलेल्या शेतकऱ्यांची रोपे पाण्याखाली असल्याने रोपे सडण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

पाऊस, वारा आणि गारवा, यामुळे उबेसाठी शेकोट्या पेटल्या जात आहेत. तसेच पशुधन वाचविण्यासाठी जनावरांना गोठ्यातच बांधुन ठेवण्यात आले आहे. रतनवाडी, घाटघर व साम्रद या परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. पाणलोटात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत असून रतनवाडीत पाच इंच तर घाटघर येथे चारचार इंच पावसाची नोंद झाली आहे.

कळसुबाईच्या डोंगरावर पाऊस कोसळतच असल्याने निळवंडे धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. सर्वांचे लक्ष लागुन असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणी साठा साठ टक्क्याच्या पुढे गेला असून ११०३९ दलघफु क्षमतेच्या असलेल्या भंडारदरा धरणात ६७४२ दलघफू पाणी जमा झाल्याने धरण ६१.७७ टक्के भरले आहे.

रतनवाडी १२५ मिली मीटर पाऊस

गेल्या चौवीस तासात भंडारदरा येथे १११ मिली मीटर तर घाटघर येथे १२० मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर रतनवाडीला सर्वात जास्त म्हणजे १२५ मिली मीटर पाऊस पडला. वाकी येथे १०५ मिली मीटर तर पांजरे येथे ११५ मिली मीटर पाऊस पडला. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात विनिर्माण केंद्रातून ८४० क्युसेसने पाणी विसर्जित होत आहे. तर धरणामध्ये एकुण २८२ दलघफु नविन पाणी आले आहे. धरणाच्या पाणी साठ्यावर धरण शाखाप्रमुख अभिजित देशमुख यांच्यासह प्रकाश चव्हाण, अंतु सगभोर, मंगळीराम मधे, चंद्रकांत भगत, रमेश सोनवणे, प्रकाश उघडे हे कर्मचारी बारीक लक्ष ठेऊन आहेत.