अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात नेमणूक होती.

राहुरी शहर हद्दीत नगर मनमाड राज्य महामार्गावर एक वाईन शॉपचे दुकान आहे. त्या ठिकाणी लिकर खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातून ग्राहक येत आहेत. त्या ग्राहकांवर व वाईन शॉपवर कारवाई करु नये. यासाठी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याने वाईन चालकाला दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली.

तडजोड अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र या दरम्यान वाईन चालकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी,

पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदी पोलीस पथकाने (दि.५) मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान त्या वाईन शॉप परिसरात सापळा लावला.

त्यावेळी आरोपी ज्ञानदेव गर्जे याने वाईन शॉप चालकाकडून १५ हजारांची लाच घेतली. त्यावेळी दबा धरुन बसलेल्या पोलिस पथकाने झडप घालून आरोपी ज्ञानदेव गर्जे याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेत गजाआड केले.

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सहाय्यक फौजदार ज्ञानदेव नारायण गर्ने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे.