प्रधानमंत्री आवास योजनेत ‘ही’ नगरपरिषद आहे जिल्ह्यात अव्वल!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल योजनेचे काम उत्कृष्टपणे करण्यात जामखेड नगरपरिषद नाशिक महसूल विभागात तिसऱ्या स्थानावर तर नगर जिल्ह्य़ात प्रथम स्थानावर असल्याची माहिती जामखेड मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली .

नगरपरिषद कार्यक्षेत्रात वैयक्तिक स्वरूपातील घर बांधणी अंतर्गत एकूण ४९९ घरकुलांचे बांधकाम सुरु झाले. त्यापैकी २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.

बांधकाम चालू असलेल्या उर्वरित २६४ पैकी १७१ घरकुले बांधकामाच्या अंतिम टप्प्यात असून लवकरच ही घरकुले पूर्ण होणार आहेत.

नगरपरिषद मार्फत सुरु झालेली एकूण घरकुले तसेच पूर्ण झालेल्या घरकुलांची संख्या ही नगर जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांच्या तुलनेत एक नंबर असून

नाशिक विभागातील एकूण ५८ नगरपरिषद / नगरपंचायत पैकी अमळनेर ( जि. जळगाव ), जामनेर ( जि. जळगाव ) नंतर सर्वाधिक वैयक्तिक घरकुले पूर्ण करणारी नगरपरिषद म्हणून जामखेड नगरपरिषदेचा क्रमांक ३ लागतो.

प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासन व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पात्र लाभार्थ्यांचा ३ वेळा मेळावा घेतला.

शासनाकडील प्रलंबित अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थ्यामध्ये घरकुल बांधण्यासाठी उत्साह निर्माण झाला. विविध टप्प्यावरील कामे पूर्ण झाल्यानंतर कामाचा फोटो (जिओटॅगींग) करून २-३ दिवसांत लाभार्थ्याच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात येते.

यानुसार ऑक्टोंबर २०२० पर्यंत ३२ घरकुले पूर्ण होती. मागील एक वर्षात सुमारे २०३ घरकुलांचे काम पूर्ण झालेली असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.