Sangamner News : बिबट्याची दहशत कायम ! ‘पाटबंधारे’चे कर्मचारी थोडक्यात बचावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली आहे. येथील नागरीकांना दोन अथवा तीन बिबटे दिसून येतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह महिलाना शेतात जाणे धोक्याचे झाल्यामुळे शेतीकामात अडथळे येत आहेत.

तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याना देखील दहशतीखाली या परिसरातून प्रवास करावा लागत असतो. शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ल्याच्या घटना नेहमीच्या झाल्या असून पाळीव कुत्रे, मोर, कोल्हे, ससे हे प्राणी फस्त होत आहे.

त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरे लावुन हे बिबटे जेरबंद करत नागरीकांची दहशतीतून मुक्तता करावी, अशी मागणी बापूसाहेब निर्मळ, पप्पू होडगर, सोमनाथ घोलप, सोमनाथ शिंदे, संपत निर्मळ, सोमनाथ निर्मळ, सुभाष जुधारे, सोमनाथ जुधारे आदीसह परिसरातील शेतकरी व नागरीकांनी केली आहे.

उंबरी बाळापूर शिवारात मागील अनेक महिन्यांपासून बिबट्याची दहशत असून नुकतेच बिबट्याच्या हल्ल्यातून पाटबंधारे कर्मचारी संजय सिताराम तळोले ( वय ५०) हे थोडक्यात बचावले आहे. तर मंगळवारी पहाटे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शिवाजी ताबाजी भुसाळ यांच्या गोठ्यातील कालवड ठार झाली आहे.

निमगावजाळी येथील रहिवासी असलेले ओझर बंधारा येथील पाटबंधारे विभागाचे कर्मचारी संजय तळोले हे शनिवार (दि. २) सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीवरून ओझरच्या दिशेने चालले होते.

यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने लेंडी पुलालगत त्यांच्यावर झेप घेत हल्ला केला मात्र, सावध असलेल्या तळोले यांनी दुचाकी जागेवर फिरवल्याने बिबट्याला माघारी फिरावे लागले.

तर दुचाकी पडल्यामुळे तळोले यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. तसेच मंगळवारी पहाटे गावालगत असलेल्या शिवाजी ताबाजी भुसाळ यांच्या जनावरांचे गोठ्यातील कालवडीवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्यामुळे त्याचे अंदाजे १० ते १५ हजार नुकसान झाले आहे.