Ahmednagar News : अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न, चोरटयांनी भरदुपारी मंगलकार्यालयातून दागिण्यासह रोकड लांबवली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर शहरात चोरट्यांचे प्रताप वाढत आहेत. आता थेट मंगलकार्यालयातून चोरटयांनी हात साफ करत दागिने व रोकड लांबवली आहे. सावेडी उपनगरातील बंधन लॉन्स येथून मुलीला लग्नात देण्यासाठी सासूने केलेले सोन्याचे गंठण, मंगळसूत्र तसेच रोकड असा 58 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी (दि.17) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

मुलीचे वडिल ठकाराम मुरलीधर तुपे (वय 57 रा. संजोग हॉटेलच्या मागे, सावेडी) हे नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आहेत. त्यांनी सोमवारी (दि.18) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी : रविवारी बंधन लॉन्स येथे ठकाराम तुपे यांच्या मुलीचा विवाह माजलगाव (जि. बीड) येथील मुलाशी होता. विवाहातील सर्व विधी पार पाडत असताना मुलीची सासू महानंदा संदीपान लेंडाळ यांनी मुलीला लग्नात देण्याकरीता केलेले 11 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 2.41 ग्रॅमचे मंगळसूत्र व लग्नात आलेले आहेराचे सर्व पैशाचे पाकिट एका पर्स मध्ये ठेवले होते.

दरम्यान विवाहातील सर्व विधी पार पाडल्यानंतर महानंदा लेंडाळ या वधु-वर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गेल्या असता त्यांनी पर्स जवळच ठेवली होती. त्याच दरम्यान चोरट्यांनी पर्स लंपास केली. काही वेळाने फोटो काढून झाल्यानंतर महानंदा लेंडाळ या पर्स घेण्यासाठी गेल्या असता त्यांना पर्स दिसली नाही.

पर्स चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समधील गंठण, मंगळसूत्र व 15 हजाराची रोकड असा 58 हजाराचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.