अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील भेंडे येथील लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी विभागात काम करत असताना गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या अशोक भीमा गायकवाड (४१ वर्षे) या कामगाराचा मंगळवारी सायंकाळी ५.४० वाजता औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. आसवनी विभागात काम करत असताना मागील गुरुवारी सायंकाळी ४.२० वाजता कँडेनसेट हॉट वॉटर टाकीतील गरम पाणी अंगावर पडून तीन कामगार भाजले होते.
त्यातील अशोक गायकवाड जास्त भाजल्याने त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १५ नोव्हेंबरला रात्री त्यांना पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने मृत्यू झाला.
घाटी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर बुधवारी दुपारी दोन वाजता भेंडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, कारखान्यातील कामगार व मित्रमंडळी उपस्थित होती.
कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी श्रद्धांजली अर्पण करून मृत कामगाराच्या कुटुंबाला व्यवस्थापन यथोचित मदत व सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. भाजलेल्या उर्वरित दोन कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved