कांद्याच्या दरात मोठी घसरण ! कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प,कांदा निर्यातबंदीचे दुसऱ्या दिवशीही पडसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News : कांदा निर्यात बंद करण्याच्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही उमटले. पिंपळगाव बसवंत, विंचूर वगळता जिल्ह्यातील अन्य सर्व ठिकाणचे कांदा लिलाव शनिवारी बंदच होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

पिंपळगाव आणि विंचूर येथे लिलाव सुरू असले तरी दरात मात्र प्रतिक्विटल १५०० ते २००० रुपयांची घसरण झाली. निर्यातबंदीच्या विरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून, नजीकच्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनांचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला असन त्याचे तीव्र पडसाद नाशिक जिल्ह्यात उमटले आहेत. निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव वेगाने घसरल्यामुळे संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत,

तर दुसरीकडे कांदा व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकला आहे. शनिवारी पिंपळगाव आणि विंचूर वगळता व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला नाही. त्यामुळे अन्य सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले.

प्रहारचे आज डेरा डालो आंदोलन

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात रविवार, १० डिसेंबर रोजी नाशिक येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या निवासस्थानासमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमवेत डेरा डालो आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

कांदा उत्पादक पंतप्रधानांना भेटणार

निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात निम्म्यापेक्षा अधिक घसरण झाल्याने एका दिवसात शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवावी, या मागणीसाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटतील, असा ठराव शनिवारी देशवंडी (ता. सिन्नर) येथे झालेल्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत करण्यात आला.

शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या आंदोलन

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी चांदवड येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता चांदवड-आग्रा रोड चौफुलीवर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.