महावितरण विरोधात भाजपचे आज ‘टाळे ठोको’ आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- करोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिलांची वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत.

थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही.

याविरोधात भाजपने आवाज उठवला आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने वीज कंपनीच्या विरोधात शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावमध्ये टाळे ठोको आंदोलन केले जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे राज्यात सरकार असताना शेतकर्‍यांना कधीही वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही व वीज ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागला नाही.

उलट वीज ग्राहकांना दिलासा देण्याची भूमिकाच भाजपा सरकारने घेतली होती. करोना काळात अवाजवी वीज बिल आल्यावर ती बिलं भरण्याची क्षमता सामान्य माणसाकडे नाही.

विविध कारणांनी संकटात आलेला शेतकरीही वीज बिल भरण्याच्या मानसिकतेत नाही. करोना प्रसारापूर्वी राज्य सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील जनतेला शंभर यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र आजवर ते पाळले गेले नसल्याने ती घोषणा फसवी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे याचा विरोध म्हणून आज भाजपच्या वतीने कोपरगावमध्ये टाळे ठोको आंदोलन केले जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe