डेंग्यू, चिकनगुनिया सदृश्य आजाराची साथ ! रुग्णांत दिवसेंदिवस वाढ, दवाखाने झाले हाऊसफुल्ल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health News : मिरजगाव शहरासह परिसरात डेंग्यू व चिकनगुनिया सदृश्य आजाराचे तसेच वातावरण बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये हिवताप, डेंग्यू,

चिकनगुनिया सदृश्य रूग्ण, पेशी कमी होणे, सर्दी, खोकला, या कारणांसाठी दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.

मिरजगाव परिसरात थंडीचा जोर कमी जास्त होत असून, पहाटे थंडी तर दिवसभर कडक उन्ह जाणवत असल्याने सातत्याने होत असलेल्या या वातावरणातील हवामान बदलामुळे सर्दी, खोकला, हिवतापाच्या रुग्णांमध्ये तसेच डेंग्यू चिकनगुनिया सदृश्य आजाराची साथ फैलावत असल्याने रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

यामुळे दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याचे दिसत आहेत. बहुतांश भागात या आजाराचे रूग्ण आहेत. परिसरात घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने सकाळी व सायंकाळच्या वेळी सुई टोचल्या प्रमाणे डास चावत आहेत.

डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात फॉगिंग मशिनने धुरळणी फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याने व दिवसेंदिवस या साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून परिसरात वाढत्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. परिसरात रस्त्याची कामे चालू असल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहेत. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. शिवाय ग्रामीण भागात डेंग्यू व चिकनगुनिया सदृश्य तापाने फणफणलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे, त्वचेवर पुरळ येणे, अशी डेंग्यूची लक्षणे आहेत. ताप आणि इतर लक्षणे जवळजवळ एक आठवडा टिकतात. परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकतो.

चिकनगुनिया तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. तीव्र सांधेदुखी, अंगदुखी, अति थकवा येतो. डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे. सामान्यतः हिवताप आजारात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था,

ही हिवताप, मलेरियाची लक्षणे आहेत. थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या वातावरण बदलामुळे रुग्णांची संख्या वाढत असून, रात्री – पहाटे थंडी व दिवसा कडक ऊन पडत असल्याने साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. खासगी दवाखान्यातून आरोग्य विभागानी मागविलेल्या माहितीनुसार मिरजगावात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आजाराचे लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत.: डॉ. हरिष दराडे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मिरजगाव.