सोयाबीन, सूर्यफूल तेलाची आवक वाढली ! खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने झाले हे बदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agricultural News : देशाची पामतेलाची आयात विद्यमान तेल वर्षांच्या पहिल्या ११ महिन्यांमध्ये वार्षिक आधारावर २९.२१ टक्क्यांनी वाढून ९०-८० लाख टन झाल्याचे तेल उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे.

जगातील प्रमुख वनस्पती तेल खरेदीदार असलेल्या भारतात गेल्या वर्षी याच कालावधीत ७०.२८ लाख टन पामतेल उत्पादनांची आयात करण्यात आली होती. दरम्यान, २०२२-२३ या तेल वर्षाच्या नोव्हेंबर – सप्टेंबर या कालावधीत देशाची एकूण वनस्पती तेलाची आयात २० टक्क्यांनी वाढून १५६.७३ लाख टन झाली आहे.

वर्षभरापूर्वी १३०.१३ लाख टन आयात झाली होती. सप्टेंबरमध्ये देशाच्या वनस्पती तेलाच्या आयातीत ५ टक्क्यांनी घट झाली आहे.गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १६.३२ लाख टनांवरून १५.५२ लाख टनांवर घसरल्याचे संघटनेने म्हटले आहे.

नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान पाम उत्पादनांच्या आयातीत झपाट्याने वाढ झाली आहे. सोयाबीन आणि इतर तेलांच्या तुलनेत कच्च्या पामतेलाच्या आयातीला थोडासा फटका बसला आहे. ही आयात ऑगस्ट महिन्यातील ८.२४ लाख टनांवरून सप्टेंबरमध्ये एकूण ७.०५ लाख टनांवर आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

तेल वर्ष २०२२-२३ च्या नोव्हेंबर – सप्टेंबर कालावधीत एकूण शुद्ध आरबीडी पामोलिन तेल आयात २०.५३ लाख टनांवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १७.१२ लाख टन आयात करण्यात आली होती.

आरबीडी पामोलिन आयात एकूण पाम आयातीच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. क्षमतेच्या दृष्टीने देशांतर्गत पामतेल शुद्धीकरण उद्योगाच्या कामकाजावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

किंमत घसरल्याने मागणीमध्ये वाढ

देशात पुरेशी उपलब्धता असतानाही देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्याने मागणी वाढल्याचे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आकडेवारीवरून दिसून येते. अलिकडच्या काही महिन्यांत देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने दरडोई वापर वाढला आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.

सोयाबीन, सूर्यफूल तेलाची आवक वाढली

भारत प्रामुख्याने इंडोनेशिया आणि मलेशियामधून पामतेल आयात करतो. अर्जेंटिनामधून सोयाबीन तर सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियामधून आयात केले जाते. गेल्या सहा महिन्यांत सूर्यफूल आणि सोयाबीन तेलांची आवक झपाट्याने वाढली आहे.

चालू तेल वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत ही एकूण आयात ६३.८७ लाख टन होती. मागील वर्षीच्या याच कालावधीत ५६.३५ लाख टन आयात झाली होती.