Soybean Crop Variety: खरिप हंगामात सोयाबीनच्या ‘या’ वाणांची लागवड म्हणजे निश्चित पैसा आणि उत्पादनाची हमी! वाचा या वाणांची वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Variety:- महाराष्ट्रात खरीप हंगामातील प्रमुख पिके हे कपाशी आणि सोयाबीन असून महाराष्ट्रातील मोठ्या भागांमध्ये या दोन्ही पिकांची लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जाते. महत्वाचे म्हणजे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित या दोन्ही पिकांवर अवलंबून असते.

यामध्ये सोयाबीन पिकाची लागवड महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असल्यामुळे नक्कीच उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. परंतु या प्रयत्नांमध्ये लागवडीसाठी निवडलेला सोयाबीनचा वाण देखील दर्जेदार असणे तितकेच गरजेचे आहे.

लागवडीसाठी निवडण्यात आलेला वाण जर दर्जेदार नसेल तर व्यवस्थापन कितीही अचूक आणि व्यवस्थित ठेवले तरी उत्पादनाला त्याचा फटका बसतो. म्हणून सोयाबीन लागवडीसाठी वाणाची निवड करताना दर्जेदार वाणांची निवड करणे गरजेचे आहे.

 सोयाबीनचे हे वाण देतील भरघोस उत्पादन

1- केडीएस 992( फुले दूर्वा)- सोयाबीनचा हा वाण संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेला हा एक उत्कृष्ट असा वाण आहे. लागवडीनंतर सरासरी 110 ते 105 दिवसात काढणीस तयार होतो.

सोयाबीनच्या या जातीला फांद्या भरपूर प्रमाणात लागतात आणि महत्त्वाचे  म्हणजे कीटक व रोगांना खूप कमी प्रमाणात बळी पडणारी ही जात असल्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणी वरील खर्च बऱ्यापैकी वाचतो. तसेच सोयाबीनच्या या वाणाचे दाणे टपोरे आणि वजनदार असतात. तुम्हाला जर यावर्षी टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड करायची असेल तर या वाणाची निवड तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

2- ग्रीन गोल्ड 3444- हा सोयाबीनचा वाण भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून लागवडीनंतर साधारणपणे 95 ते 100 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. सोयाबीनच्या या जातीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला लांबट/ लहान आकाराची पाने असल्यामुळे खोडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचतो व त्यामुळे सोयाबीनच्या या वाणाला फुलधारणा जास्त होते.

या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या 60% शेंगांमध्ये चार दाणे असतात. तसेच शेतामध्ये ज्या ठिकाणी पाणी साचून राहत असेल अशा ठिकाणी देखील हा वाण खराब न होता व्यवस्थित तग धरून राहतो. त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो किंवा अतिवृष्टी होते अशा ठिकाणी या वाणाची लागवड केली तर उत्पादनाला फटका बसत नाही व चांगल्यापैकी उत्पादन मिळते.

3- फुले संगम सोयाबीनचा हा वाण राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला असून यालाच केडीएस 726 असे देखील म्हणतात. लागवडीनंतर हा साधारणपणे 105 ते 110 दिवसात काढणीस येतो. या वाणाचे सोयाबीनचे दाणे टपोरे आणि दिसायला देखील आकर्षक असतात.

जर टोकन पद्धतीने लागवड करायची असेल तर हा वाण उत्कृष्ट ठरतो. या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा येलो मोझॅक आणि इतर किडींना लवकर बळी पडतो. त्यामुळे जर तुम्हाला हा वाण लागवडीसाठी वापरायचा असतो तर याचे व्यवस्थापन अगदी योग्य पद्धतीने व अचूक असणे गरजेचे आहे.