साकीनाका प्रकरणी आरोपीला फाशी, गृहमंत्री वळसेपाटील म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra news : मुंबईतील साकीनाका बलात्कारआणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहानला दिंडोशी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाच्या या निकालावर समाधान व्यक्त करताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई पोलिसांचे कौतूक केले आहे.या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच याद्वारे महिला सुरक्षितता आणि महिलांच्या सन्मानाविषयी महाराष्ट्र पोलिस अत्यंत जागरूक असल्याचा संदेश समाजात पोहोचावा, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

वळसे पाटील यांनी म्हटले आहे, या प्रकरणातील आरोपीला दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत सरकारतर्फे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

साकीनाका घटनेतील मुंबई पोलिसांचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा १० मिनीटे इतका जलद होता. या बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी अत्यंत जलदगतीने पूर्ण केला. संबंधित आरोपीविरोधात सर्व पुरावे जमा करून पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पोलिसांनी चोखपणे आपले कर्तव्य बजावत हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवण्याची मागणी केली. त्यामुळे न्याय प्रक्रियेला गती मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखवलेल्या कार्यतत्परतेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.