Radhakrishna Vikhe Patil: मोठी बातमी ..! राधाकृष्ण विखे-पाटील होणार विधानसभा अध्यक्ष ?; अनेक चर्चांना उधाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Radhakrishna Vikhe Patil:  राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर शिवसेनाचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली आहे. याच बरोबर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

यानंतर आता नवीन मंत्रिमंडळामध्ये भाजपाकडून कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच अहमदनगर जिल्ह्यातून राम शिंदे (Ram Shinde) आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री पद मिळणार असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु होती मात्र आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे विखे पाटील यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर आणि भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील  यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र जर  राधाकृष्ण विखे-पाटील यांना विधानसभा अध्यक्षपद मिळाल्यास ते सक्रीय राजकारणापासून दूर जाऊन त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत येण्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे.

त्यांना मंत्रिपद आणि अहमदनगरचे पालकमंत्री पद मिळेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्री पद मिळाल्याने सर्व समीकरण बदली आहे. यामुळे आता जिल्हयातून मंत्रिपदासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत विखे-पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सरकार न आल्याने विखे-पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तरीही त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून राज्यातील तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला.

पक्षाच्या उघड आणि गोपनीय मोहिमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे आता सरकार आल्यावर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. मात्र, आता मंत्रिपदाऐवजी त्यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत काहीही निर्णय झालेला नाही.