नागरिकांना सरकारी बँकबद्दल विश्वास असतो… आमदार पवारांचा बँक संपाला पाठिंबा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील नऊ कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे.

मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपला या संपाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. बँकांच्या राष्ट्रीयकरणाला जवळपास बावन्न वर्षे पूर्ण होत असताना देशात सरकारी बँकांचे खाजगीकरण करण्याची तयारी सुरू आहे.

सरकारी बँकाचा एनपीए वाढत असून या बँका तोट्यात चालतात, केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात बँकांना आर्थिक सहाय्य करावे लागते, परिणामी बँकांना पोसणे सरकारला शक्य नसल्याने बँकांचे खाजगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु बँकांचे खाजगीकरण हा एकमेव उपाय आहे का? सरकारी बँकांचा नफा कमी आहे, त्यांची व्यावसायिकता कमी आहे, एनपीए जास्त आहे, या सर्व गोष्टी मान्य आहेत, परंतु त्यामागील कारणांचा देखील विचार करणे गरजेचे आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

हा विषय केवळ बँक कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित नसून आपल्या सर्वांशी, आपल्या पुढच्या पिढ्यांशी, देशाच्या भवितव्याशी संबंधित आहे. सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिकांच्या हितासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

पवार यांनी म्हटले आहे की, या संपाची पार्श्वभूमी आणि बँकांचे खाजगीकरणाचे धोरण लक्षात घेणे गरजेचे आहे. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनामध्ये बँकांची भूमिका फार महत्त्वाची असते. नागरिकांना सरकारी बँकबद्दल एक विश्वास असतो.

खासगीच्या तुलनेत सरकारी बँक सुविधा जरी चांगली देत नसली तरी आपला विश्वास सरकारी बँकेवरच जास्त असतो. सरकारी बँकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असतात. सरकारी बँकांचे आज जवळपास दहा लाखाहून अधिक कर्मचारी आहेत.

बँकांचे खाजगीकरण झाले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. ज्या क्षेत्रात नफा असेल त्याच क्षेत्रात बँका गुंतवणूक करतील.

एकूणच आर्थिक शक्ती काही हातांमध्ये एकटवली जाईल आणि आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंदावेल. सरकारी बँकांची प्रशासन व्यवस्था सुधारणे नक्कीच गरजेचे आहे, परंतु खाजगीकरण हाच एकमेव पर्याय नाही, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर