Ahilyanagar News : सामान्य नागरिकांच्या गुंतवणुकीच्या नावाखाली शेकडो कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेली व्हीआयपी जी ग्रुप ग्लोबल ऑपिलिएट बिजनेस संबंधित प्रकरणी कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी २० जून रोजी आरोपी किरण पितांबर अनारसे याचा भाऊ अशोक पितांबर अनारसे यांच्या घरी छापा टाकला.
सुमारे दहा ते बारा तास यांची कसून चौकशी केली आहे. यामध्ये यातील प्रमुख आरोपी विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे यांच्याशी दुबईशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावांमधील विनोद खुटे यांनी मेसर्स व्हीआयपी जी या नावाने एक ग्रुप स्थापन करून या अंतर्गत अनेक कंपन्यांची निर्मिती करून त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपयांची रक्कम कर्जत जामखेड अहिल्यानगर मधील काही तालुके व राज्यभारामधून व राज्याबाहेरून गोळा केली.
ही रक्कम बनावट कंपनी व खात्यांच्या माध्यमातून व्यवहारात आणली त्यानंतर हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईत पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर हे पैसे तपास यंत्रणेच्या नजरेत येऊ नये यासाठी यूएसबीटी कूट चलनाचा देखील त्यांनी वापर केला. सक्त वसुली संचालनायने आतापर्यंत या कंपनीच्या विविध ठिकाणी छापे मारून 75 कोटी 42 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
विनोद खूटे याचा खर्चाचा तपशील तपासला असता त्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. यामधून त्यांनी दुबई व भारतात मालमत्ता देखील खरेदी केली आहे.
याप्रकरणी पुणे यासह ठिकठिकाणी विनोद खुटे, संतोष खुटे,मंगेश खुटे,किरण पितांबर अनारसे आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत.
या संदर्भात कर्जत तालुक्यातील आंबे जळगाव येथे अशोक पितांबर अनारसे याच्या घरी दिनांक 20 जून रोजी ईडीने छापा टाकला व सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत चौकशी केली. या तपासी पथकाला जनावरांच्या गोठ्यामध्ये दुबईशी संबंधित काही वस्तू आढळून आल्या. यानंतर त्यांनी पुन्हा काही तास चौकशी करून अशोक अनारसे याचा जबाब नोंदवून घेतला आहे.