Hyundai Growth ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या स्थापनेच्या 29 व्या वर्धापन दिनी एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. 6 मे 1996 रोजी भारतात आपल्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ह्या कंपनीने आतापर्यंत 1.27 कोटीहून अधिक कार्सची विक्री केली असून, यामध्ये 37 लाखांपेक्षा जास्त कार्सची निर्यात करण्यात आली आहे. आज ह्युंदाई केवळ एक कार ब्रँड न राहता, देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचा एक अविभाज्य भाग बनली आहे.
ह्युंदाईचा भारतातील प्रवास
भारतामध्ये ह्युंदाईचा प्रवास 1998 मध्ये सुरू झाला होता, जेव्हा श्रीपेरंबुदूर (तामिळनाडू) येथील उत्पादन प्रकल्पात सॅन्ट्रो कारचे उत्पादन सुरू झाले. त्यानंतर कंपनीने क्रमश: i10, i20, व्हेर्ना, क्रेटा, व्हेन्यू यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्स सादर केली. ह्युंदाईने भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार आपले उत्पादन पोर्टफोलिओ सतत अपडेट केले आणि आता कंपनीची अत्याधुनिक इलेक्ट्रिक SUV – आयोनिक 5 सुद्धा बाजारात आहे.

ह्युंदाईने महाराष्ट्रातील तळेगाव येथे 2025 अखेरीस एक नवीन प्रगत उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लांटमुळे ह्युंदाईची उत्पादन क्षमता दरवर्षी 10 लाख युनिट्सपर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चेन्नईमधील असलेल्या उत्पादन केंद्रात ₹1,500 कोटींचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे, जे कंपनीच्या भविष्यातील योजना अधिक बळकट करेल.
ह्युंदाईसाठी भारत हा एक प्रमुख बाजार असून, कंपनीच्या एकूण जागतिक विक्रीत भारताचा वाटा आता 18.5% इतका झाला आहे. 2008 मध्ये कंपनीने भारतातून 5 लाख युनिट्सची पहिली निर्यात केली होती, तर 2025 पर्यंत ही संख्या 37 लाखांवर पोहोचली आहे. ही वाढ भारतातील उत्पादन क्षमतेबरोबरच ह्युंदाईच्या जागतिक विश्वासार्हतेचेही द्योतक आहे.
सामाजिक क्षेत्रातही ठसा
ह्युंदाईने CSR (Corporate Social Responsibility) क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. कंपनीच्या ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनने गेल्या 5 वर्षांत सामाजिक उपक्रमांमध्ये ₹400 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. याचा फायदा दरवर्षी सुमारे 20 लाख नागरिकांना मिळतो आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात कंपनीने अनेक सकारात्मक उपक्रम राबवले आहेत.
ह्युंदाई आता भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर भर देत आहे. आयोनिक 5 प्रमाणे अधिक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक वाहनांची रचना सुरू आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट हे कंपनीसाठी पुढील वाढीचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
ह्युंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी सांगितले की, “भारत आमच्या हृदयात आहे. 29 वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज भारताच्या यशोगाथेचा एक भाग बनले आहे.” ह्युंदाईने केवळ कार्स तयार केल्या नाहीत, तर भारतीयांच्या आयुष्यात आपले स्थान निर्माण केले आहे. आता कंपनीच्या पुढील टप्प्यांमध्ये स्मार्ट मोबिलिटी आणि शाश्वत भविष्यकडे भर देण्याची योजना आहे.