“बेजबाबदारपणा चालणार नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात वीज संकट (Power crisis) निर्माण झाले आहे. त्यामुळे महावितरण (Mahavitaran) आणि ऊर्जामंत्री यांच्याकडून वीज वाचवण्याचे आव्हान केले जात आहे. तसेच विजेची उधळपट्टी करू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले आहे. तसेच वीज गळतीकडे दुर्लक्ष करू नका असे आव्हानही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, वीज तुटवड्याची (Power outage) स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी.

याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज येथे दिले.

याशिवाय महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी यासाठी खासगी वीज कंपन्या (Private power companies) तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबतचे काटेकोर नियोजन करावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्याची विजेची निकड पूर्ण व्हावी यासाठी सर्व ते पर्यायांची पडताळणी करण्यात यावी. वीज गळतीच्या बाबतीत बेजबाबदारपणा चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नका. वीजेचे संकट हे केवळ आपल्या राज्यातच नाही तर ते देशातील अन्य राज्यांतही आहे.

त्यामुळे अन्य राज्ये करत असलेल्या उपाययोजना, वीज देवाण-घेवाण याबाबत माहिती घेण्यात यावी. वीज बचतीबाबत राज्यातील ग्रामपंचायतींपासून ते सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सतर्क करावे.

सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनीही वीज संकटाबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले, विजेची समस्या ही अपुरा कोळसा पुरवठा त्याचबरोबर उन्हाळ्यात अचानक वाढलेली मागणी यामुळे निर्माण झाली आहे.

यावर तात्काळ तोडगा काढण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वॉर स्टेशन स्थापन करण्यात आल्या आहेत. वीज तुटवडा असणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे एकच राज्य नसून, देशात २७ राज्यांमध्ये अशीच स्थिती आहे.

राज्यात अखंडीत वीज उपलब्ध व्हावी यासाठी कोळसा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर, वीज बचत करणारी उपकरणे वापरणे, वीज वापराबाबातचे ऊर्जा परिक्षण, नादुरूस्त उपकेंद्र बंद करणे असे ऊर्जा बचतीच्या उपाय योजना करण्यावर भर देण्यात येत आहे.

याशिवाय वीज निर्मितीसाठी कोळश्याचा नियमित पुरवठा व्हावा यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. वाँशरीजमधून कोळसा आणण्यासाठी रेल्वे उपलब्ध न झाल्यास, रस्तेमार्गे वाहतूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.