पशुधन धोक्यात ! बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याने मानवीवस्तीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आधीच नागरिकांमध्ये भीती पसरली असताना आता बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन देखील धोक्यात आले आहे.

नुकतेच अशीच एक घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे एका शेतकऱ्याच्या चार दुभत्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे.

यामुळे सुदाम नारायण शिंदे यांचे सुमारे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. कोपरगाव येथील वनरक्षक पवार, डॉक्टर खेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. प्रवरा पंचक्रोशीत बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात हल्ले वाढले आहेत.

तसेच प्रवरा पट्ट्यात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने बिबट्यांना आयता आसरा मिळत आहे. तसेच मुबलक पाणी उपलब्ध आहे. यामुळे बिबट्याकडून शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे, पाळीव कुत्री यांना भक्ष्य बनवले जात आहे.

अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करताना दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन नित्य झाले आहे. शेतात पाणी भरताना, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. मजूर काम करायला धजावत नाहीत.