नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री, तनपुरे झाले पालकमंत्री

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra Politics :- मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत. अटकेत असले तरी त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मात्र, त्यांच्याकडील खाती आणि पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे मलिक आता बिनखात्याचे मंत्री राहिले आहेत.

मलिक यांच्याकडील गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नगरचे पालकमंत्रीपद तनपुरे यांना देण्यात येणार असल्याची चर्चा होती.

ते अद्याप मिळाले नाही. मात्र, दूरच्या गोंदिया जिल्ह्याची का होईना पालकमंत्रीपदाची जबाबदारी तनपुरे यांना मिळाली आहे.

मलिक यांच्याकडील परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांच्याकडील खातीही मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.

या बैठकीत पवार यांनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात सक्रीय होण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नगरचे पालकमंत्री मुश्रीफ यांनाही आता नगरकडे लक्ष द्यावे लागणार आहे.