“आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते, त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात सध्या धर्मावरून राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या वक्तव्यावरून हिंदुत्वाचे (Hindutva) चांगलेच राजकारण तापले आहे. याच मुद्यांवरून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

फडणवीस म्हणाले, आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर ‘गदाधारी’ नावाचं नवहिंदुत्व उदयाला येत आहे. मात्र, रोज सकाळी राज्याची भीषण परिस्थिती पाहता त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी असल्याचा प्रत्यय येतोय असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा (Amit Shaha) यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ हे पुस्तक त्यांच्या वाटचालीचा महत्त्वाचा आलेख आहे.

भारतीय जनता पार्टीत एक सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होतो हे यानिमित्ताने समजते. अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील जय-पराजयानं समजून घेता येत नाही.

त्यांनी भाजपाची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी, पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार, पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती, कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे अनेक कंगोरे या पुस्तकातून लोकांसमोर आले आहेत.

अनेकदा विरोधक अमित शहा यांना टार्गेट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कणखर आणि संवेदनशील अमित भाई विरोधकांना पुरून उरले.

त्यांचे आधुनिक चाणक्य म्हणून होणारे कौतुक सार्थ ठरणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, चाणक्य आणि सावरकरांना ते प्रेरणा मानतात. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचा संपूर्ण अभ्यास करून गुजराती भाषेत पुस्तक लिहिले असून ते लवकरच प्रकाशित होणार आहे.

वरून कणखर वाटणारे अमित शहा कुटुंबवत्सल आहेत. भारतीय संगीताची त्यांना उत्तम जाण असल्याचे म्हणत फडणवीस यांनी अमित शहा यांचे कौतुक केले आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, 2014 मध्ये शिवसेनेसोबत युतीने लढायचं ठरवलं तेव्हा अमित शहा दीड महिना मुंबईत ठाण मांडून होते.

त्याचाच प्रत्यय म्हणजे भाजपाने घवघवीत यश मिळवत शिवसेना मोठा भाऊ आणि भाजपा छोटा भाऊ हे मिथ्य बदलून टाकले. त्यावेळी महाराष्ट्राला मोठा भाऊ कोण हे अमित शहा यांच्यामुळेच समजले असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.