रेखा जरे हत्याकांड ; बोठेच्या जामीन अर्जाबद्दल आताची मोठी बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rekha Jare murder Case :- रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद येथील खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या नियमित जामीन अर्जावर न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तीवाद झाला.

न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी आता सोमवार, 7 मार्च ही तारीख ठेवली आहे. त्या दिवशी जामीन अर्जावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

मागील वर्षी जातेगाव (ता. पारनेर) घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी बोठे याचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली होती.

अनेक दिवसांपासून बोठे अटकेत असून मध्यंतरी त्याने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, जिल्हा न्यायालयात जामीन न मिळाल्याने बोठेच्यावतीने वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला आहे.

त्याच्या जामीन अर्जावर युक्तीवाद झाला. सरकारी वकील काळे यांनी म्हणणे सादर केले आहे. यावेळी तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) हे उपस्थित होते.

आरोपी बोठे यांच्या वतीने अ‍ॅड. भूषण ढवळे, सुनिल करपे, आदित्य भावके आदी काम पाहत आहेत. मूळ फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. सचिन पटेकर हे काम पाहत आहेत.

जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. दोन्ही बाजूने युक्तीवाद झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी आता 7 मार्च रोजी तारीख ठेवली आहे.