पाण्यात बुडालेल्या चिपळूणतील पूर परिस्थितीची मुख्यमंत्री आज पाहणी करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- कोकणात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. चिपळूण, महाड, खेड तालुक्यात महापूरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होणार आहेत.

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या एमआयडीसी हेलिपॅड येथे 11 वाजता ते पोहोचतील. त्यानंतर ते वाहनाने चिपळूणकडे रवाना होतील. दुपारी 12.20 वाजता चिपळूण येथे आगमन होऊन नंतर ते मदत व बचाव कार्याची पाहणी करतील.

त्यानंतर ते दुपारी 2.40 वाजता अंजनवेलहून हेलिकॉपटरने मुंबईकडे रवाना होणार आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही आज कोकण दौरा असणार आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.