‘वेदांता-फॉक्सकॉन’ची गुजरातमधील जागाच निश्चित नाही, रोहित पवार यांचा दावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News:महाराष्ट्रातील सरकारच्या उदासिनतेमुळे वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातमध्ये गेली, असे आरोपप्रात्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे.

या कंपनीला गुजरातमध्ये अद्याप जागा नक्की झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकल्प आता महाराष्ट्रात येणे शक्य नसल्याचे बोलले जात असतानाच पवार यांनी कंपनीची गुजरातमध्येही शोधशोध सुरू असल्याकडे लक्ष वेधले आहे.

आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, ‘वेदांता-फॉक्सकॉनने महाराष्ट्रात जागा निश्चिती केली असतानाही राजकीय उदासिनतेमुळे गुजरातमध्ये गेलेला हा उद्योग अजूनही तिकडं जागेचा शोध घेतोय…

हे म्हणजे एकीकडं जेवण तयार असतानाही त्याकडं दुर्लक्ष करुन दुसरीकडं जेवण बनवण्यासाठी लाकूडफाटा जमा करण्यासारखा प्रकार आहे. वेदांता-फॉक्सकॉनवरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करुन राज्यातील युवांना नोकरी मिळणार नाही.

त्यामुळं डबल इंजिनचा प्रचार करणाऱ्या राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडं आग्रह धरावा,’ ही विनंती, असेही पवार यांनी म्हटले आहे.