निसर्गाचा प्रकोप ! राज्यात मुसळधार पावसाने घेतले 136 नागरिकांचे बळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  महाराष्ट्र राज्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही तासांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसामुळे जलप्रलय आल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात दरड कोसळल्याच्या देखील वाढल्या आहेत.

त्यामुळे अनेकांचा जीव देखील गेला आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे 136 बळी गेल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. यंदा दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळीये गावात आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप 20 ते 30 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा 70पर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

तर साताऱ्यात मिरगावात दरड कोसळून 12 ठार, आंबेघरमध्ये 17 जण दरडीखाली अडकल्याची भीती आहे. रत्नागिरीत जिल्ह्यातील पोसरेत 4 जण ठार, तर 13 जण बेपत्ता झाले आहेत. तर चिपळूणमध्ये मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

सध्याही राज्यात पावसाचा जोर कायम आहे. अनेक जिल्ह्यात पूरात अनेक लोक वाहून गेल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवसात देखील राज्यात सर्वत्र पाऊस कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या पावसात एकूण 89 जणांचा मृत्यु झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. रेड अलर्ट भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आधीच पावसाने तडाखा बसलेल्या सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे राज्यातील लोकांना पावसापासून काहीसा दिलासा मिळालेला दिसत नाही.

आयएमडीने ‘मुसळधार पावसाचा’ अंदाज वर्तविला आहे आणि खबरदारीच्या उपाययोजनांची शिफारस केली आहे. किनारी भागातील कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पुढील 24 तास रेड अलर्ट बजाविण्यात आला आहे.