१ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : नवीन वर्ष, नवीन संकल्प हा प्रत्येकाचा आवडता विषय.वर्षाच्या सुरुवातीलाच जणू आपण स्वतःला नव्यानं घडवायला लागतो; पण ८० टक्क्यांहून अधिक लोकांचे नवीन वर्षाचे संकल्प फेब्रुवारी संपायच्या आतच मोडतात.हे का होतं ? कारण आपण आपल्या उत्साहात संकल्प तर करतो,पण ते निभावण्याचा प्रयत्न मनापासून करत नाही. त्यामुळे अनेक जण केवळ ‘आरंभशूर’ ठरतात.
खरं सांगायचं तर,आपण अशा गोष्टींसाठी संकल्प करतो ज्या आपल्या दैनंदिन सवयींच्या बाहेरच्या असतात.उदा. “यंदा मी रोज १० किलोमीटर पळणार,” असं ध्येय ऐकायला भारी वाटतं,पण प्रत्यक्षात ते तितकं सोपं नसतं.शिवाय, नवीन वर्षाच्या पहिल्या काही दिवसांत आपण सगळंच एकदम करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे थकवा येतो, अपेक्षाभंग होतो आणि आपण हळूहळू रस्त्यावरून पुन्हा भरकटतो.
संकल्प करताना प्रॅक्टीकल असावा “यंदा आरोग्य सुधारायचं” हा संकल्प अस्पष्ट वाटतो, पण “मी आठवड्यातून तीन वेळा ३० मिनिटं चालणार” असं ठरवलं, तर ते सोपं आणि साध्य होणारं असतं.मानस शास्त्रज्ञ म्हणतात की संकल्प ‘सोपे आणि लहान’ असावेत. मोठ्या बदलांपेक्षा, आपल्या जीवनशैलीत छोटे सकारात्मक बदल घडवणं सोपं असतं.
नवीन वर्षाची सुरुवात ही बदल घडवण्याची चांगली वेळ असते,पण संकल्पासाठी १ जानेवारी हा एकमेव दिवस नाही.तुमचं जीवन बदलायचं ठरवलं असेल, तर कोणताही दिवस योग्य आहे.संकल्पांना फक्त नवीन सुरुवातीची नाही, तर दीर्घकालीन प्रयत्नांची जोड दिल्यास ते यशस्वी होतात.तर यंदा आरंभशूर होण्यापेक्षा प्रामाणिक राहा, सातत्य ठेवा, आणि तुम्ही ठरवलेलं यशस्वी करा.कारण बदल ही एक प्रक्रिया आहे, एकाच दिवसाचं काम नाही. नवीन वर्षाला नवा जोश नक्की द्या, पण तो टिकवण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहा !
का होतो आपण आरंभशूर?
बहुतेक लोकांचा उत्साह वर्षाच्या पहिल्या काही आठवड्यांतच मावळतो.याला मुख्य कारण म्हणजे आपले संकल्प पूर्ण करण्याचा ठोस आराखडा नसतो. वरवरची उद्दिष्टं ठरवली जातात;पण त्यांना साध्य करण्यासाठी लागणारी सातत्यपूर्ण मेहनत होत नाही.शिवाय,आपली अपेक्षा इतकी जास्त असते की,ती पूर्ण न झाल्यास निराशा वाढते.
आरंभशूर होण्यापेक्षा सातत्य ठेवा
शेवटी,नवीन वर्षाच्या संकल्पांमधील खरे गमक आहे, ते दीर्घकाळ टिकवण्याचं.मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी,एका वेळेस एक सवय अंगीकारा.बदल हळूहळू घडतो, पण सातत्य ठेवल्यास तो कायमस्वरूपी होतो.
संकल्प टिकवण्यासाठी काही टिप्स
एकावेळी एक गोष्ट : एकाच वेळी सगळ्या संकल्पांवर काम करण्याऐवजी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा.
स्वतःची प्रगती मोजा: आपण ठरवलेलं किती पार केलंय, हे दर महिन्याला तपासा.
यश साजरं करा : एखादा टप्पा पूर्ण झाल्यावर छोटं सेलिब्रेशन करा.
शेअर करा : तुमचे संकल्प इतरांसोबत शेअर करा.
हार मानू नका : मध्येच खाडा झाला, तर हार मानू नका. पुन्हा सुरुवात करा.
मित्राची मदत घ्या : संकल्पामध्ये मित्राला बरोबर घ्या.
योजना आखा : संकल्प करताना फक्त उत्साहाला थारा देऊ नका,तर त्यांना निभावण्यासाठी योजना आखा.एखादं साध्य ध्येय ठरवा,त्यासाठी वेळ द्या आणि त्यावर प्रामाणिकपणे काम करा.