सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांना करता येईल मदर डेअरीच्या सहकार्याने व्यवसाय! निवृत्तीनंतरही मिळेल लाखो रुपये कमावण्याची संधी

Ajay Patil
Published:
safal stores

बरेच जवान हे सैन्यातून निवृत्त होतात व त्यानंतर काय करावे याच्या विचारात ते असतात. निवृत्तीनंतर बरेच जवान एखाद्या ठिकाणी  परत नोकरीला सुरुवात करतात किंवा काहीजण हे एखाद्या व्यवसायामध्ये उतरतात. निवृत्तीनंतर बरेचजण कोणता व्यवसाय करावा याच्या शोधामध्ये असतात.

कारण व्यवसायाची निवड करताना तो व्यवसाय चांगला नफा मिळवून देणारा व जास्तीत जास्त शारीरिक श्रम त्यामध्ये असणार नाही या पद्धतीने  व्यवसायाची निवड करण्यासाठी प्रयत्न केले जातात. या सगळ्या मुद्द्यांना समोर ठेवून सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांसाठी मदर डेअरीने व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे व ती देखील खूप कमीत कमी गुंतवणुकीत.

 सैन्यातून निवृत्त झालेल्या जवानांना मदर डेअरीच्या साह्याने करता येईल व्यवसाय

सैन्यातील निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत मदर डेअरीच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात करू शकतात. यामध्ये स्टोअर उघडण्याकरिता मदर डेअरी आणि आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन कडे अर्ज सादर करणे गरजेचे राहील. नंतर काही महत्त्वाची प्रक्रिया असते ती पूर्ण केल्यानंतर तुम्हाला यशस्वी स्टोर उघडता येते.

मदर डेअरीच्या माध्यमातून यशस्वी म्हणजे सफल स्टोअर 1988 मध्ये सुरू करण्यात आलेले होते व आज सफलचे दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, गुरुग्राम आणि फरीदाबाद मध्ये 400 स्टोअर्स असून बेंगलोर मध्ये देखील 23 रिटेल स्टोअर्स आहेत. मदर डेअरीच्या माध्यमातून जे काही सफल स्टोअर उघडण्यात आलेले आहेत ते प्रामुख्याने सैन्यातून निवृत्त झालेले व्यक्ती चालवतात.

 सफल अर्थात यशस्वी स्टोर कसे उघडावे लागेल?

1- याकरिता सर्वप्रथम आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनकडे अर्ज करावा लागेल.

2- त्यानंतर तुम्हाला सफल आणि आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशनने घेतलेल्या संयुक्त मुलाखतीला जावे लागेल.

3- याकरिता तुम्हाला किमान दोन लाख रुपये जमा करणे गरजेचे राहील व यामध्ये एक लाख रुपये तुम्हाला रिफंडेबल असतील व एक लाख रुपये खेळत्या भांडवलासाठी वापरले जातील.

4- यामध्ये तुम्हाला दोन सरकारी अधिकारी हमीदार म्हणून आवश्यक असतील.

5- त्यानंतर वाटप केलेले सफल स्टोअर कसे चालवावे या संबंधीचे प्रशिक्षण सफलद्वारेच अर्जदाराला दिले जाईल.

 सफल स्टोअरसाठी मदर डेअरी काय करते सहकार्य?

सफल आउटलेटचे भाडे, युटिलिटी बिले आणि देखभाल खर्च या संबंधित तुम्हाला एक रुपया देखील भरावा लागणार नाही. हा सर्व खर्च सफलच्या माध्यमातून करण्यात येतो. त्यानंतर स्टोरमध्ये लागणारे डिस्प्ले रॅक, इलेक्ट्रॉनिक वजन यंत्रे, डीप फ्रिजर्स, व्हीएसआय कुलर,

प्रमोशनसाठी लागणारे साहित्य तसेच व्यवसाय सेटअप करण्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक पायाभूत सुविधांसह सुसज्ज आऊटलेट मदर डेअरीच्या माध्यमातून देण्यात येते. त्यासाठी दोन वर्षासाठी करार करण्यात येतो व या दोन वर्षात तुमच्या स्टोरची कामगिरी कशी आहे यावर पुढे कराराचे नूतनीकरण करण्यात येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe