संगमनेरमध्ये क्रिडा स्पर्धेत २५०० महिलांचा सहभाग, ६५ वर्षीय आजींनी केली फलंदाजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून येथील एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील २५०० महिलांनी सहभाग घेतला.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील वडगाव लांडगा येथील ६५ वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद घेतला.

येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी काल शनिवारी (दि.९) वडगाव लांडगा विरुद्ध पिंपळगाव या संघामध्ये ५ षटकांची मॅच झाली.

यामध्ये प्रथम वडगाव लांडगाकडून सलामीसाठी सुमन बाळासाहेब लांडगे मैदानात येतात उपस्थित सर्व महिला व मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. आजींनी पहिला बॉल अत्यंत सुंदर खेळून काढला तर दुसऱ्या बॉलवर दोन रन काढून संघाची सुरुवात केली. पुन्हा दोन बॉल खेळून काढल्यानंतर सहाव्या बॉलवर खणखणीत चौकार मारला.

६५ व्या वर्षी अत्यंत तंदुरुस्तीने व आनंदाने मैदानात उतरताना सर्व युवतींना प्रोत्साहित केले. पाच षटकांच्या समाप्तीनंतर ३६ धावसंख्येवर पिंपळगाव कोंझिरा संघाला आव्हान दिले.

त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्ररक्षण करताना आजींनी क्रिकेट प्लेअरची टोपी घालून सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करताना या क्रिकेट खेळाचा आनंद घेतला. या खेळात पिंपळगाव कोंजीरा संघ विजयी झाला.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, लहान मुलींसह अनेक महाविद्यालय युवती आणि खियांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने ही स्पर्धा यशस्वी ठरत असून महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले आहे.

महिलांमध्ये आरोग्य जाणीव जागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून वर्षभर महिलांसाठी विविध उपक्रम सुरू राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.