महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- शरद पवारसाहेबांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे…त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘८ दशके कृतज्ञतेची’ या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोविड काळात आपण अनेक जिव्हाळ्याची नाती गमावली. त्यामुळे खासदार पवारसाहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा विचार केला. मात्र, राज्याच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब सामान्य कार्यकर्ते तसेच अनेक विभागातील प्रतिष्ठित माणसं यांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा असा आग्रह आम्ही ठेवला आणि पवार साहेबांनी याला होकार दिला आणि हा कार्यक्रम पार पडत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

आज देशाच्या राजधानीच्या दारात शेतकरी बसला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय खासदार पवारसाहेबांनी ८० वर्षाचा कालखंड अविरत लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केलेय. पुढील ५०-१०० वर्षांनी देखील भारतातील सर्व घटकांना मदत करणारा नेता म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले जाईल असेही पाटील यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र कुणामुळे घडला यात अनेक दिग्गजांची नाव घेता येतील त्यात प्रमुख नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. पण महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्राला आकार देणारे म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले तर चुकीचे ठरणार नाही. २०१९ ला झालेला चमत्कार आपण पाहिला. झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले. काही लोक म्हणाले की पवारसाहेबांचा राजकीय कालखंड समाप्त झाला परंतु त्यांनी बॉडीगार्ड आणि सरकारी लवाजमा सोडून महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. मागच्या निवडणुकीत अनेकांनी पक्ष सोडला.

मी सगळ्यांना सांगत होतो आमच्याकडे अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर क आहे आणि इतकंच नाही तर आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे, हे पूर्णतः खरे ठरले आहे. मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच पवारसाहेबांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याची माहिती दे असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षात पाणी समुद्रात वाया जाणार, हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल.

त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी हा ‘पण’ करतो की महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले दिसेल असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला. पवारसाहेबांकडे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना पूर्ण झाली हा विश्वास मिळतो असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आयुष्यात पराभव माहीत नाही. ५५ वर्षे लोकांच्या हितासाठी सदनात काम केले आहे. ते म्हणजे पवारसाहेब. महाराष्ट्राचा आकार साहेबांमुळे घडला आहे. काही मुख्यमंत्री परदेशात इव्हेंट करायला म्हणून जातात. परंतु पवारसाहेब त्याकाळात तरुण उद्योजकांना घेऊन अमेरिकेत गेले होते याची आठवण जयंत पाटील यांनी करुन दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा आज पवारसाहेब सांभाळत आहेत असे सांगतानाच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.

Leave a Comment