अहमदनगर ब्रेकिंग : वृत्तपत्राच्या संपादकासह टपरी चालकाला अटक ! जाणून घ्या सविस्तर प्रकरण…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर शहरातील सायंदैनिक एका वृत्तपत्राचे संपादक मनोज मोतीयानी यांच्यावर खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बातमी दिल्याच्या रागातून टपरीचालकाने असा गुन्हा दाखल केल्याचा दावा संपादकाने केला आणि टपरीचालकाविराधोतही फिर्यादी दिली. यावरून त्या टपरीचालकालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान प्रेस क्लबने या अटकेचा निषेध केला असून हा खोटा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी देखील पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मनोज वासुमोल मोतीयानी हे (वय ३१. रा. सावेडीगाव) येथील एका सायंदैनिकाचे संपादक असून त्यांच्याविरूद्ध काशिनाथ बबन शिंदे (वय ३२, रा. वैदुवाडी) या पानटपरीचालकाने फिर्याद दिली आहे.

शिंदे याने म्हटले आहे की, ‘शुक्रवारी सकाळी मोतीयानी माझ्या टपरीवर आला. वाढदिवसानिमित्त जाहिरात पाहिजे, त्यासाठी दहा हजार रुपये दे, अशी मागणी केली. मात्र आपण पैसे देण्यास नकार दिल्याने मोतीयानी याने गावठी कट्टा काढून माझ्या डोक्याला लावला.

माझ्या गल्ल्यातून ३ हजार रुपये काढून घेतले. व आपल्याला धमकी देऊन निघून गेला. त्यांनतर रात्री अकराच्या सुमारास मी पुन्हा मोतीयानी याला फोन करून सावेडी गावाच्या कमानीबाहेर ये व पैसे घेऊन जा, असे म्हणालो. त्यावेळी माझ्यासोबत रोहित उर्फ तात्या मिश्रा हेही होते.

थोड्या वेळाने मोतीयानी तेथे आला. मला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोलिसांना बोलावून घेतले. पोलिस आले व मला पोलिस ठाण्यात घेऊन आले.

’या फिर्यादावरून पोलिसांनी मोतीयानीविरूद्ध खंडणी, तसेच धमकी आणि शस्त्र कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला. दुसरी फिर्याद मोतीयानी यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, ‘शुकवारी रात्री घरी असताना काशिनाथ शिंदे याचा फोन आला की मला तुझ्यासोबत बोलायचे आहे.

त्यामुळे मी घरातून बाहेर रस्त्यावर आलो असता काशिनाथ शिंदे याने त्याच्या हातातील रिव्हॉल्वर माझ्या डोक्याला लावले. मला म्हणाला की, तू आमच्या बिंगोच्या धंद्याच्या बातम्या लावतो. आमच्या दोन नंबरच्या धंद्यामध्ये अडथळा आणतो. तुझा काटाच काढतो, तुझे कुटुंब संपवून टाकीन असे धमकावले.

मी घाबरून तोफखाना पोलिसांना फोन केला. पोलिस आले व शिंदे याला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. मी त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो असता तक्रार देत असतानाही त्याने मला शिवीगाळ दमदाटी केली आहे.

अशी फिर्याद मोतीयानी यांनी दिली. त्यावरून शिंदे याच्याविरूद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.