Ahmednagar City News : चक्क अहमदनगर महानगरपालिकेची फसवणूक ! तब्बल १४ लाख…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : मनपा हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका घेतलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेच्या (नांदेड) संचालकाने वसूल केलेली १४ लाख ८६ हजाराची रक्कम मनपाकडे भरणा न करता या रकमेचा अपहार केला आहे.

याबाबत सोमवारी (दि. १०) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. मनपाच्या मार्केट विभागाचे प्रमुख विजयकुमार नेवतराम बालानी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. या ठेकेदार संस्थेचे संचालक गणेश भगत यांना मनपाने १ डिसेंबर २०२२ पासून शहर हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसुलीचा ठेका दिलेला होता.

सदर ठेकेदार संस्थेने १ डिसेंबरपासून ५ जून २०२३ पर्यंत मनपा हद्दीत रस्ता बाजू शुल्क वसूल केले. परंतु सदर कालावधीत त्याने केवळ ६ लाख ९० हजार ८५५ रुपये एवढाच भरणा केला. उर्वरित रकमेचा भरणा करण्यासंदर्भात त्याच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला.

मात्र, त्याने अद्यापपर्यंत थकित रकमेचा भरणा केला नसल्याने त्याने एकूण १४ लाख ८६ हजार रुपये रकमेचा अपहार केला असल्याचे समोर आले.

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी श्री छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार सेवा संस्थेचा संचालक गणेश भगत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मार्केट विभाग प्रमुखास दिले. त्यानुसार विजयकुमार बालानी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरुन पोलिसांनी गणेश भगत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.