Ahmednagar News : पालकमंत्री विखे यांच्यावर प्रवरा दुर्घटना प्रकरणी स्थानिकांकडून प्रश्नांचा भडीमार

vikhe

Ahmednagar News :अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेल्या जवानांची बोटही बुडून तीन जवान ठार झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात आज (२३ मे) घडली. दरम्यान आता या घटनेचे पडसाद उमटू लागले असून स्थानिक नागरिक आक्रमक व्हायला लागले आहेत.

सुगाव येथील आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवलाय. प्रवरा नदीत युवक व त्यानंतर त्यांच्या शोधार्थ निघालेले SDRF चे जवान बुडून मृत्युमुखी पडले असल्याने आता स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिकांनी अकोले गावातील सुगाव येथे राधाकृष्ण विखे पाटील यांचा ताफा अडवत काही प्रश्नांची सरबत्ती केली.

अद्यापही यातील दोघे सापडत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप का कमी केला नाही? असा सवाल या नागरिकांनी विखे पाटील यांना विचारला आहे. बचाव कार्य धिम्या गतीने सुरू असल्याचा आरोपही यावेळी स्थानिक नागरिकांनी केला आहे.

अकोले तालुक्यातील या केटिवेअरवर पोहण्यासाठी काही युअवक गेले होते. त्यात दोन युवक बुडून गतप्राण झाले. ही घटना काल बुधवार दि. 22 मे रोजी दुपारी घडली व त्यांना शोधण्यासाठी SDRF च्या जवानांचे एक पथक सुगाव परिसरात आज दि. 23 मे रोजी तेथे आले होते.

त्यांनी सकाळी साडेसहाच्या दरम्यान एका स्थानिक व्यक्तीला सोबत घेत पाण्यातील घटनास्थळ दाखविण्यासाठी बोट घेऊन पाण्यात उतरले. तेथे केटिवेअर असल्याने घटनास्थळी फार मोठा भोवरा निर्माण झाला आणि ही बोट अचानक पलटी झाली. यात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे,

राहुल गोपीचंद पावरा(कॉन्स्टेबल), वैभव सुनील वाघ (चालक) या तिघांचा मृत्यू झालाय. सोबत जो स्थानिक व्यक्ती गणेश मधुकर वाकचौरे (वय-38,रा. मनोहरपुर,ता. अकोले) नेला होता तो मात्र बेपत्ताच आहे.