पुण्याचा माणूस होता अहमदनगरचा दुसरा खासदार ! कोण होते आर. के. खाडिलकर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Loksabha : सध्या संपूर्ण देशभर अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते जय्यत तयारी करत आहेत. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे.

तत्पूर्वी भारतीय निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक घेणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या काही दिवसात मतदानाला सुरवात होणार आहे. देशात यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्रबाबत बोलायचं झालं तर राज्यात लोकसभा निवडणूक 5 टप्प्यात पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे आणि निवडणुकीचा निकाल हा चार जून 2024 ला जाहीर होणार आहे. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अहमदनगर उत्तर आणि अहमदनगर दक्षिण मध्ये देखील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर यावेळी नगर दक्षिण मध्ये विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. म्हणजे यंदाची निवडणूक ही दोन्ही नगरकरांमध्येच होणार आहे.

मात्र आज आपण अहमदनगरच्या अशा एका खासदाराची माहिती जाणून घेणार आहोत जे की मूळचे पुण्याचे होते मात्र ते नगरचे दुसरे खासदार बनलेत. हो, आज आपण आर. के. खाडीलकर यांच्या विषयी जाणून घेणार आहोत. रघुनाथ केशव खाडिलकर पुण्याचे स्वातंत्र्य सैनिक होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

स्वातंत्र्य चळवळीत काम करताना त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. 1934 मध्ये स्थापित झालेल्या सोशियालिस्ट काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य राहिलेत. 1945 ते 1950 या काळात ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेत. 1948 मध्ये मात्र त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली. पुढे 1955 मध्ये त्यांनी भारतीय कामगार पक्षाची स्थापना केली.

नंतर मग 1957 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अर्थातच दुसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाचा पुण्याचा माणूस खासदारकीसाठी उभा राहिला होता.

खरंतर लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे उत्तमचंद रामचंद भागवत यांनी विजयी पताका फडकवली होती. त्यांनी 1952 मधल्या दुष्काळात चांगले कामही केले होते. ते गांधीवादी विचाराचे होते. भाऊसाहेब फिरोदिया यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी पिंपळगाव मालवी तलावाचे काम मार्गी लावले होते. मुळा धरणाच्या निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. 1952 च्या दुष्काळाची दाहकता भागवत यांनी संसदेत मांडण्याचे काम केले आणि त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना दुष्काळग्रस्त भागात आणले.

यामुळे त्यावेळी दुष्काळग्रस्तांना ताबडतोब मदत मिळणे शक्य झाले. मात्र असे असले तरी 1957 मध्ये अर्थातच लोकसभेच्या दुसऱ्या निवडणुकीत पुण्याचे स्वातंत्र्यसैनिक रघुनाथ केशव खाडिलकर यांनी भागवत यांचा पराभव केला. रघुनाथ केशव खाडिलकर हा पुण्याचा माणूस अहमदनगरचा दुसरा खासदार बनला.

भागवत पराभूत होण्याचे महत्त्वाचे कारण ठरले तत्कालीन संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेस विरोधात महाराष्ट्रात नाराजी होती. याच कारणामुळे 1957 मध्ये रघुनाथ केशव खाडिलकर हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्यांनी निवडून आले.

दरम्यान, पाच वर्ष खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांचा भारतीय कामगार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. पुढे 1962 मध्ये आणि 1967 मध्ये म्हणजेच तिसऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत खाडिलकर यांनी त्यांच्या गृह जिल्ह्यात अर्थातच पुणे जिल्ह्यातील खेड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आणि तेथून दोन्ही वेळा निवडणूक जिंकली. म्हणजेच ते सलग तीन वेळा खासदार म्हणून दिल्लीत गेले.

विशेष म्हणजे चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत अर्थातच 1971 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळी त्यांनी एक लाख तीस हजार मतांनी समोरच्याला निवडणुकीत चिटपट केले अन विजयाचा चौकार मारला. पुण्याचे हे स्वातंत्र्यसैनिक लोकसभेचे उपसभापती, पुरवठा मंत्री तसेच कामगार आणि पुनर्वसन मंत्री देखील राहिलेत.