महामार्गालगतची जुनी विहीर ठरू शकते अपघातास कारण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत शिर्डीकडून झगडे फाट्याकडे जाताना वाटेत एक खोल विहीर महामार्गाला एकदम लागूनच आहे. तिला योग्य प्रकारे सुरक्षा कठडे नसल्यामुळे ती मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते, असे चित्र समोर आले आहे.

विहीर ४०-५० फूट खोल आहे व ती कोरडी पडली असून ती महामार्गाच्या हद्दीत आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ती का बुजवली नाही? हा एक मोठा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तिला सुरक्षा कठडेदेखील तयार केलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ही विहीर मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते.

सिन्नर- शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०चे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट झालेले आहे. पालखी रस्त्याचे कामदेखील अपूर्ण आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी, घरे, विहिरी, व्यावसायिक आस्थापना, रस्ता रुंदीकरणांमध्ये बाधित झालेल्या आहेत,

त्यातील अनेकांना शासनाकडून मोबदला न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याचे काम करता आले नाही. काम अर्धवट स्थितीत आहे, तसेच कोपरगाव- संगमनेर हा राज्यमार्ग झगडे फाटा येथे राष्ट्रीय महामार्गाला छेदून जात असल्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर करण्यात आला; परंतु तो उड्डाणपूल देखील अर्धवट स्थितीत बांधून पडला आहे.

त्याचाही उपयोग फक्त स्वागत कमानीपुरताच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गावर वाढलेले अपघाताचे प्रमाण, वाढलेल्या भुरट्या चोऱ्या, रहदारीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीत उभी राहणारी मोठी अवजड वाहने यामुळे जनसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे; परंतु याकडे वाहतूक शाखेचे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

झगडे फाटा या ठिकाणी दिशादर्शक फलक लावलेले नसल्यामुळे व रहदारीच्या दृष्टिकोनातून योग्य काळजी घेतलेली नसल्यामुळे अनेक वाहन चालकांची फसगत होऊन विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचे अनेक वेळा दिसून येत आहे. काही जाणून-बुजून विरुद्ध दिशेने चालतात.

त्यामुळे मोठ्या अपघाताला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याकडेही वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे येथील नागरिकांनी बोलून दाखवले आहे. या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याची मागणी चांदेकसारे घारीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे

पश्चिमेला समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपुलाजवळ वाहतूक शाखेचे कर्मचारी असल्याचे भासवून परराज्यातील ट्रॅव्हल्सच्या गाड्या व खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्या तपासल्या जातात व चिरीमिरी घेऊन त्यांना सोडून दिले जाते.