Milk Price Issue : दुग्ध व्यवसाय अडचणीत ! शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे, का लागली दुग्ध व्यवसायाला घरघर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतातील उत्पन्न पीक लागवडी नंतर किमान सहा महिने तरी येत नाही, तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो तसेच शेतकरी आता रासायनिक खतांऐवजी शेणखताकडे वळले आहेत,

दुभत्या गाईच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ज्या शेतकऱ्यांकडे घरचा चारा उपलब्ध आहे, त्यांना दुग्ध व्यवसाय परवडतो. मात्र, विकत घेऊन जनावरांना चारा घालणे परवडणारे नाही, पशुखाद्याच्या दरात वाढ व दूध दर कमी, अशा विचित्र परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय तोट्याचा ठरू पाहत आहे.

दुध वाढीसाठी दुभत्या जनावरांना सकस आहार द्यावा लागतो. मात्र, खाद्याच्या किमती वाढल्याने जादा किमतीत खाद्य खरेदी करावे लागत असून, दुधाचे दर ५ ते ६ रुपयांनी घसरले आहेत. एकूण परिस्थिती पाहता दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला असून, यातून शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे आहे.

गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर लिटरमागे ५ ते ६ रुपयांनी घसरले असून, यापूर्वी प्रतिलिटर ३३ ते ३५ रुपये दर मिळत होता, तो आता २८ ते २९ रुपये लिटर मिळत आहे. ज् या शेतकऱ्यांना ८ ते १० दुभती जनावर आहेत, त्यांना थोडे फार उत्पन्न मिळते.

मात्र, ज्यांच्याकडे एक किंवा दोन जनावरे आहेत, त्यांच्यासाठी हा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या गाईच्या किमती लाखांपर्यंत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही पशुपालक कर्ज काढून गाई व म्हशी घेतात.

ते कर्ज फेडण्यासाठी पशुपालक पहाटेपासून राबवतात; परंतु दुधाचे दर घसरल्याने पशु पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त जोडधंदा करण्यास सांगितले जाते. मात्र, दूध दरातील घसरणीमुळे दुग्ध व्यवसाय नुकसानीचा ठरत आहे.