गावात डरकाळ्या फोडू नका, शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा ! विखे पिता-पुत्रावर महिला सरपंचाचा घणाघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

परंतु निर्यातबंदी निर्णयावरून संभ्रम निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत.

निर्यातबंदीचा हा निर्णय फसवा असून कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णत: उठवली पाहिजे अशी मागणी करत महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी विखे पाटलांच्या राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे यांनी कांदा निर्यात बंदीवरून विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली असून सरकारला शेतीचं अर्थकारण समजून सांगणं हे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचे काम आहे,

गावात लुडबुड करायची आणि गावात डरकाळ्या फोडायच्या यापेक्षा शेतकऱ्यांसाठी सभागृहात डरकाळी फोडा असे टीकास्त्र त्यांनी सोडले आहे.

कोण आहेत प्रभावती घोगरे व त्या नेमके काय म्हणाल्या?

लोणी खुर्द गावाच्या विद्यमान सरपंच सध्या प्रभावती घोगरे या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजकीय विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. 1978 साली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये शिर्डी मतदासंघांचे असणारे आमदार स्वर्गीय चंद्रभान घोगरे हे प्रभावती घोगरे यांचे सासरे होत.

प्रभावती घोगरे या आंदोलनाच्या वेळी म्हणाल्या, सरकारला शेतीचं अर्थकारण समजून सांगणं हे विधिमंडळात प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचे काम आहे, तुम्ही आमचे प्रश्न संसदेत आणि विधीमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे.

गावात लुडबुड करायची आणि गावात डरकाळ्या फोडायच्या यापेक्षा शेतकऱ्यांसाठी सभागृहात डरकाळी फोडा असे म्हणत त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार सुजय विखे यांचे कान टोचले.