Ahmednagar News : कंटेनरवर कार आदळल्याने चालक ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. ही घटना नगर सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर सोमवारी (दि.१८) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव आहे. मयत शेख हे त्यांची मारुती ईरटीगा कार (क्र. एम एच १६ सी वाय ८९४३) घेवून नगरहून सोलापूर महामार्गाने सोमवारी पहाटे कोयाळ गावाकडे जात असताना साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर रस्त्यात एक कंटेनर उभा होता.

कार वेगात असल्याने त्यांना कंटेनरचा अंदाज न आल्याने कार पाठीमागून जोरात कंटेनरवर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन चालक शेख हे गंभीररित्या जखमी झाले. अपघाताचा आवाज आल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांचे चुलत भाऊ शब्बीर अब्दुल शेख हेही तेथे आले.

त्यांनी जखमी शेख यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील मेडिकल ऑफिसर डॉ. ढगे यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. गणेश लबडे हे करत आहेत.