नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील लोकांना आता घरबसल्या पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे. ही योजना प्रारंभी प्रभाग २, ४, ५ व ६ याप्रभागांमध्ये पुढील महिन्यात सुरू होणार असून नंतर इतर ठिकाणी करण्याचे नियोजन आहे.

पुणे, मुंबई या मेट्रो शहरांच्या धर्तीवर आता ही योजना नगर शहरात सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, या योजने अंतर्गत पाइपलाइनचे गॅस कनेक्शन असलेल्या ठिकाणी प्रत्येक घरात मीटर लावले जाणार आहे.

त्यामुळे गॅसच्या वापरानुसार पैसे द्यावे लागणार असल्याने गॅस टाकीसाठी जादा पैसे देण्याचे टळणार आहे. शिवाय बुकिंगची देखील गरज पडणार नाही आणि नागरिकांची टाकीसाठी होणारी धावपळ टळणार आहे.

शहरातील नागरिकांना गॅस नियमित उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी प्रारंभी संकल्पना मांडली होती.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यांनीच यासाठी मोठा पाठपुरावा केला होता. आता ही योजना लवकरच आमलात येणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सध्या शहरात घरगुती गॅस पुरविण्यासाठी ठिकठिकाणी एजन्सीचे कार्यालये आहेत. तेथून घरोघरी गाड्या पाठविल्या जातात, परंतु अनेकदा उशिर झाल्यास नागरिकांना मनस्ताप होतो.

शिवाय काही एजन्सी कडून प्रत्येक टाकीमागे २० रुपये वाहतूक खर्च देखील आकारला जातो. त्याबाबतही नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

यावेळी बोलताना नगरसेवक स्वप्नील शिंदे यांनी औरंगाबाद, दौंड येथील गॅसच्या पाइपलाइनचे काम सुरू झाल्यानंतर याबाबत मी त्या वेळी आपल्या शहरातही पाइपलाइनद्वारे गॅस द्यावा, अशी संकल्पना मांडली. त्याला आता मूर्त स्वरुप येत आहे, याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.