अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बीएसएनएलच्या सिम कार्डाची होणार होळी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला असून त्यामुळे ग्राहकांनी आपल्या सिम कार्डाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे. जग आधुनिकतेकडे झुकत असताना भंडारदऱ्याचा आदिवासी भाग मात्र नेटवर्किंग समस्येमुळे दोन पावले मागेच राहीला.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तसेच अभयारण्यामध्ये इतर कंपन्यांबरोबरच बीएसएनएल ही शासकीय कंपनीही सेवा देत आहे. त्यातच भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या अभयारण्यामध्ये फक्त बीएसएनएल या कंपनीचीच सेवा उपलब्ध आहे.

त्यातच या कंपनीच्या सेवेवरच भंडारदऱ्याच्या शेंडी या प्रमुख बाजारपेठेत बँकिंग सेवांसह, सायबर कॅफे व इतर शासकीय सुविधा अवलंबून आहेत. बँकेतही बी.एस.एन.एल.ची सेवा आहे.

त्यामुळे बी.एस.एन.एल.ची सेवा ठप्प झाल्यावर शेंडीमध्ये सेंट्रल बँकेचीही सेवा ठप्प होते. परिणामी या बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी रतनवाडी, घाटघर, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे, बारी, वारंघुशी, गुहीरे, रंधा, शेणित, लाडगाव व इतर गावांमधून आलेल्या लोकांना परत फिरावे लागते.

भंडारदरा परिसरात अनेक सायबर कॅफेवाल्यांनी ब्रॉडगेज नेटवर्क घेतलेले आहे. १ जानेवारीपासुन १८ जानेवारीपर्यंत फक्त पाच दिवस बीएसएनएल कंपनीने सेवा पुरविली आहे. अनेक विद्याथ्यांनी ऑनलाईन फॉर्मही भरले गेले नाहीत. तक्रार करूनही काहीच फायदा होत नाही.

त्यामुळे शेंडी परिसरातील बीएसएनएलच्या ग्राहकांनी एकत्र येत सिम कार्डाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जखमी युवकाला बसला फटका

बीएसएनएलच्या खंडीत सेवेचा फटका रतनवाडी परिसरात अपघात झालेल्या युवकाला बसला. नेटवर्क नसल्यामुळे १०८ क्रमांकाला फोन होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला शेंडीमध्ये येऊन नंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

बी.एस.एन.एल. चेच बील भरणे झाले अवघड

आधुनिक तंत्रज्ञान असूनही रोज बंद पडणाऱ्या आपल्या सेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. सतत खंडित होणारे ब्रॉडबॅन्ड तसेच मोबाईल सुविधेमुळे इंटरनेटचे मासिक शुल्कदेखील भरणे शक्य होत नाही. – अक्षय बागडे, सायबर कॅफे चालक