कळसुबाई शिखर महिलासांठी खुले, वादग्रस्त फलक हटविला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वांत उंच समजले जाणारे कळसुबाई शिखर हे महिलासांठी कायमस्वरुपी खुले राहणार असून कळसुबाई शिखरावर महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त नामफलक तात्काळ हटविण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर समजले जाते. या शिखरावर काही मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी घरात विटाळ असल्यास संबंधितांनी शिखर चढू नये, विवाहित महिलांनी शिखरावरील देवीच्या मंदिरात प्रवेश करू नये,

अशा सूचना लिहिलेल्या होत्या. सदर फलक हा कळसुबाई शिखराचे गिर्यारोहन करण्यासाठी आलेले गिर्यारोहक व त्यांच्या मित्रांच्या लक्षात आला होता. त्यांनी सोशल मिडीयाचा आधार घेत सदर फलकावरील सूचना सर्वाच्या निदर्शनास आणुन दिल्या

त्यामुळे महिलाविरोधातील या नामफलकाचा सर्वत्र निषेध करण्यात येत होता सदर पोस्ट अकोलेचे भुमिपुत्र राहुल भांगरे यांनी सोशल मिडीयावर टाकत महिलांवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला होता. राहुल भांगरे यांच्या सोशल मिडीयांच्या पोस्टचा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही दखल घेत अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.

बारी येथील महिला सरपंच वैशाली खाडे व जहागिरदारवाडीचे सरपंच पंढरी खाडे यांनी तात्काळ सदर घटनेची दखल घेत वादग्रस्त लावलेला फलक शिखरावरुन हटविला आहे. काही मनुवादी विचारसरणीच्या नागरीकांनी हा फलक लावला असल्याची माहिती समजत असून बारी व जहागिरदारवाडी ग्रामपंचायत व गावकरी अशा विचारसरणीला पाठीशी घालत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आदिवासी समाजामध्ये स्रीला मानाचे स्थान असून मनुष्याच्या जगण्यापासून ते मरेपर्यंत सर्व विधी ही स्रीच करते. त्यामुळे कळसुबाई शिखरावर व मंदिरात महिलांना कधीही बंदी घालण्यात आलेली नव्हती व येणारही नाही. सर्वांसाठी शिखर हे कायमस्वरुपी खुले होते व खुलेच असणार आहे, असेही यावेळी सांगितले.

नगर जिल्ह्याने काही वर्षांपूर्वीच शनिशिंगणापूर येथे खियांना प्रवेश मिळवून देत स्त्री-पुरुष समानतेचे आदर्श उदाहरण घालून दिले. अकोले तालुका जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या कांतिवीरांचा तालुका आहे.

कळसुबाई शिखरावर मनुवादी विचारसरणीच्या नागरिकांनी महिलासंदर्भात लावलेला वादग्रस्त फलक निश्चितच महिलांना खाली पाहणारा आहे. सदर फलक हा पायथ्याशी असणाऱ्या दोन्ही ग्रामपंचायतने तात्काळ हटविल्याने त्यांचे कौतुक करावे, तितके कमीच आहे. – राहुल भांगरे, गिर्यारोहक.

आदिवासी समाज्यामध्ये मातृसत्वाक संस्कृती असल्याने अशा मनुवादी विचारसरणीला समाजात कुठेही थारा नाही. आदिवासी समाज पूर्वपार आदी कालापासून स्त्रियांना आदर व सन्मानाची वागणूक देत आला आहे. आदिवासी समाजात मुल जन्माला आल्यापासून ते मरे पर्यंत हे सर्व विधी महिला कडूनच केले जातात. हे असे फलक लावणे समाजाला अशोभनीय आहेत. पंढरी खाडे, सरपंच, जहागीरदारवाडी.