सवय जाईना, एकच पोलिस दोनदा लाचेच्या जाळ्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022  Ahmednagar Crime :-एकदा लाच प्रकरणात पकडले गेला असतानाही पुन्हा असाच गुन्हा करणारा पोलिस अंमलदार श्रीगोंद्यात पकडला गेला. १७ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संजय बबन काळे (वय ३६) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आरोपी काळे याला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे काळे याला २०१७ मध्ये नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात असताना लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते.

तरीही त्याने पुन्हा लाचखोरी केल्याचे आढळून आले. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी तांदळी तक्रारदाराचे चुलते आणि चुलतभाऊ यांच्या विरुद्ध श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

त्यामध्ये आरोपींना अटक न करण्यासाठी तपासात आरोपींना मदत होईल असा तपास करण्यासाठी अंमलदार काळे याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पंचासह १० मार्चला तेथे गेले होते. पडताळणी झाली. प्रत्यक्षात लाच घेताना मात्र, आरोपीला पकडता आले नाही.

मात्र, त्याने केलेली लाचेची मागणी सिद्ध होत असल्याने त्याच्याविरूद्ध लाच मागितल्याचा गुन्हा आता दाखल करण्यात आला.

नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शरद गोर्डे, नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, वैभव पांढरे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, हरुन शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.