Maharashtra News : जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व धनुष्यबाण टिकविण्याचा त्यामागे हेतू होता. कोणत्याही दबावाला अथवा भीतीला बळी पडणाऱ्यांपैकी मी नाही.
जनतेसमोर येऊन धाडसाने निर्णय घेतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना दिले.
मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समवेत महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली.
महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अनेक टीकाकारांना तुरुंगात डांबले होते. आमचे सरकार मात्र सूडबुद्धीने कारवाई करत नाही. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्यासाठी आपण राजकीय निर्णय घेतला. दुसरीकडे विरोधक मात्र ठाकरे यांच्या विचारांना मूठमाती देत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर गेले.
कर्नाटक व इतर राज्यात सत्ता मिळविल्यास ईव्हीएमवर आक्षेप घेतला जात नाही, मात्र निकाल विरोधात गेले की विरोधक ईव्हीएमवर शंका घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवर आक्षेप घेण्याचा प्रकार चुकीचा आहे. ही दुटप्पी भूमिका आहे.
भानुदास मुरकुटे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला…
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनीही शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंत्री दादा भुसे यांनी यापूर्वी मुरकुटे यांची अशोक साखर कारखान्यावर भेट घेत सदाशिव लोखंडे यांच्यासाठी पाठिंबा मागितला होता.