प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन प्रवरा, मुळा आणि गोदावरी धरण समुहाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकरीता सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तनाचे सुयोग्य नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोदावरी, मुळा, भंडारदरा, निळवंडे कालवा प्रकल्पाची उन्हाळी हंगाम आवर्तनाच्या नियोजनाची बैठक सह्याद्री अथितीगृहात घेण्यात आली. या बैठकीत भंडारदारा धरणातून सध्या सुरू असलेल्या आवर्तना बरोबरच ४ एप्रिलपासून बिगर सिंचन आवर्तन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच २ ते ३१ मेपर्यंत सिंचनाचे आवर्तन तर शेवटचे बिगरसिंचनाचे आवर्तन करण्याबाबत मंत्र्यांनी सूचना केल्या. मुळा धरण समूहातून १२ मार्चपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. गोदावरी धरण समूहातून गोदावरी हंगामतील एक बिगर सिंचनाचे आवर्तन करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

पाण्याचा अंदाज घेऊन एक मेपासून बिगर सिंचनाचे १८ दिवसांच्या आवर्तनाचे नियोजन करण्याबाबतही सूचित केले; मात्र काही प्रमाणात जलसंपदा विभागाकडून होत असलेल्या निष्काळजी पणाबद्दल मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

उन्हाळी हंगामात कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. अथवा पाण्यावाचून शेतीचे नुकसान होता कामा नये असे सक्त आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. निळवंडे कालव्यातून होणारी गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणासाठी निधी मंजूर झाला असून त्याची काम सुरू करण्याबाबतही मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत माहीती जाणून घेतली.

बैठकीला खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीने आमदार लहू कानडे, आ. मोनिका राजळे, आ. किरण लहामटे आ. सत्यजित तांबे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,

जलसंपदा विभागाच्या सोनल शहाणे, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, सायली पाटील यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.