Ahmednagar News : चार कोटी रुपयांचा रस्ता पाण्यात गेला वाहून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय निधीतून शेवगाव – पांढरीपूल रस्त्यावरील शेवगाव ते वडुले बुद्रुक व ढोरजळगाव ते निंबेनांदूर, या दरम्यान झालेल्या कामाची महिनाभरातच दुरावस्था झाली असून,

जागोजागी खड्डे पडून रस्ता खचल्याने कामाचा दर्जा उघडा पडला आहे. चार कोटी रुपये खर्चून सुधारणा करण्यात आलेल्या या पाच किमी लांबीच्या रस्त्याची पहिल्याच पावसात वाताहत झाल्याने सरकारचा निधी अक्षरशः पाण्यात गेला असून,

या दर्जाहिन कामाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासून शेवगाव, मिरी, पांढरीपूल, या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने त्यावरून वाहन चालक व नागरिकांचा धोकादायक पध्दतीने प्रवास सुरु होता.

रस्त्यावरील खड्यांमुळे वारंवार अपघात होऊन त्यात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. शेवगाव ते वडुले बुद्रुक दरम्यान नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला व खचला होता. आ. मोनिका राजळे यांनी विशेष बाब म्हणून शेवगाव ते वडुले या साडेतीन किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला तर ढोरजळगाव ते निंबेनांदूर रस्ता दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये निधी दिला.

या कामाचे भूमिपूजन मार्च मध्ये आमदार राजळे यांच्या हस्ते झाले. मात्र, संबंधीत ठेकेदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम घाईगडबडीने व दर्जाहीन पध्दतीने उरकण्याचा प्रयत्न केला. काम सुरू असताना मुरुमाऐवजी माती वापरणे, त्यावर पाणी मारुन प्रेसींग करणे,

खडीकरण व डांबरीकरण करताना नित्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, डांबराचा अत्यल्प वापर, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, त्याकडे संबंधीत ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन रस्त्याचे काम उरकले.

दर्जाहिन पध्दतीने झालेल्या या रस्त्याची पहिल्याच पावसात अक्षरश: वाट लागली असून, महिनाभरातच जागोजागी खड़ी मोकळी होऊन खड्डे पडू लागले आहेत. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित चर न काढल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खचू लागला आहे.

त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार पध्दतीने पुन्हा करण्यात यावे, अशी मागणी वडुले बुद्रुक येथील ग्रामस्थ व युवानेते अमोल सागडे व ढोरजळगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस गणेश कराड यांनी केली आहे.