गणेगाव ग्रामपंचायतची पंचायत लर्निंग सेंटर म्हणून निवड ! अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव पंचायत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रत्येक राज्यातील पंचायतराज संस्थेने राबविलेल्या विविध उत्कृष्ट योजना, संकल्पना, उपक्रम, कामे इत्यादीची यशोगाथा सर्वांना माहिती व्हावी, त्याचबरोबर अशी गावे राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याकरता उत्कृष्ट मॉडेल म्हणून विकसित व्हावी,

या उद्देशाने शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्य पातळीवर पंचायत लर्निंग सेंटर निर्माण केले आहेत. त्यात नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातून गणेगाव ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.

शासनाने पंचायत लर्निंग सेंटर (पीएलसी) हा नावीन्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पुरस्कारप्राप्त गावे उत्कृष्ट उपक्रम संकल्पना योजना राबविताना आलेल्या अडचणी व अशा अडचणीवर मात करून यशस्वी झालेली गावे ही राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यामध्ये निर्माण व्हावीत जेणेकरून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे जिल्हा अंतर्गत राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे अशा गावांमध्ये नियमितपणे आयोजन केले जाईल,

अशा गावांचा, व्यक्तींचा आदर्श घेऊन इतर गावे प्रेरित होतील व आपल्या गावाचा विकास विभागाचा विकास करतील यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांची पंचायत लर्निंग सेंटर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर या ६ विभागांमधून एकूण ३३ ग्रामपंचायतीची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे.

नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगावची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. राहुरी तालुक्यातील आदर्श गाव गणेगाव या गावाने आजपर्यंत शासनाच्या विविध योजना यशस्वीरित्या राबवून आदर्श निर्माण केलेला आहे. शासनाचे जिल्हास्तर, विभागस्तर व राज्य स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. ग्रामविकास विभागाच्या या पंचायत लर्निंग सेंटर अंतर्गत निवड झाल्याने गावाच्या व तालुक्याच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. यात अधिकारी व ग्रामस्थयांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचे सरपंच शोभाताई अमोल भनगडे यांनी सांगितले.