अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : चक्क पाईपलाईनमधून २ कोटी ४० लाख लिटर पाणी चोरले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील राशीनला खेड येथून उच्च दाबाच्या लोखंडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही पाईपलाईन फोडून त्याला अडीच इंची पीव्हीसी पाईप जोडून पाण्याची मोठ्या प्रमाणावर चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुमारे ७ लाख २० हजार रुपये किमतीचे २ कोटी ४० लाख लिटर पाणी चोरी केल्याप्रकरणी जालिंदर लक्ष्मण नरसाळे, रा. चौकीचा लिंब, करपडी, ता. कर्जत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाईपलाईनला अनधिकृतपणे जोडणी करून हे पाणी हॉटेल व शेतीसाठी चोरून घेतल्याचे आढळून आले. पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे नुकसान करून चार ते पाच महिन्यांपासून दररोज अंदाजे २ लाख लिटर पाण्याची चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राशीनचे ग्रामविकास अधिकारी रोहिदास अंबादास कापरे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, राशीन येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून पद्मार स्वीकारल्यापासून राशीनमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी येत होत्या.

कर्मचाऱ्यांमार्फत पाईपलाईनची पाहणी केली. मात्र, लिकेज काही सापडत नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक बारकाईने निरीक्षण करण्यास सांगितले असता, राशीन ते खेड महामार्गालगत हॉटेल वृंदावनजवळ ग्रामपंचायतच्या पाईपलाईनला अडीच इंची पाईप जोडून अनाधिकाराने पाणी घेतले असल्याचे दि. २३ जुलै रोजी पाणीपुरवठा कर्मचारी जितेंद्र हौसराव गजरमल यांनी फोन करून सांगितले.

ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, ग्रामपंचायत कर्मचारी विनोद आढाव, प्रल्हाद साळवे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या वेळी राशीनचे ग्रामस्थ सावता नाना सायकर, हनुमंत प्रभाकर भांडवलकर, अक्षय बबन सायकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या मदतीने व जीसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन उकरून पाहिली असता, हा प्रकार उघड झाला. त्यानुसार कर्जत पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.