अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर : निसरड्या वाटा, फेसाळते धबधबे,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि बरेच काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भंडारदऱ्याला नेहमीप्रमाणेच मृग नक्षत्रामध्ये वर्षा ऋतुची चाहुल लागते. यंदा मात्र पावसाचे उशिरा आगमन झाले. जुनच्या शेवटी पावसाने डरकाळी फोडली.

शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वनीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे, अलंग- कलंग- मलंगसारख्या गडकोट किल्ल्यांसह निसर्ग सफरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले आपसुकच इकडे वळतात.

हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, त्यावरुन फेसाळत कोसळणारे धबधबे, पावसाच्या संततधारेने ओल्याचिब झालेल्या रानवाटा, असे आल्हाददायक वातावरण अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या भंडारदऱ्याला तयार झाले आहे.

जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन महाराष्ट्र राज्यातील पर्यटकांसह परराज्यातील पर्यटकांनाही खुणावु लागले आहे. महाराष्ट्राचे ऐव्हरेस्ट कळसूबाई, आशिया खंडातील दोन नंबरची सांदन दरी, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील खळखळणारे धबधबे, ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण अशा पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी आपसुकच वाढू लागली आहे.

केरळात मान्सुन दाखल झाल्यानंतर काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सुनचे दिमाखात आगमन होते. मुंबईमध्ये धो -धो पाऊस सुरु झाला की भंडारदऱ्यात पाऊस दाखल होण्यास उशीर लागत नाही. त्यानंतर साहजिकच पर्यटकांची पावले भंडारदऱ्याच्या दिशेने वळु लागतात.

भंडारदऱ्याच्या अभयारण्यात असणारे धबधबे हे खास करुन तरुणाईंची आवडते ठिकाण असुन अशा धबधब्यांपैकीच कोलटेंबे गावाजवळील बाहुबली धबधबा, गवळी देवाच्या डोंगरांवरुन कोसळणारा व सर्वांना मनमोहीत करणारा वसुंधरा धबधबा,

जवळच असणारा नान्ही फॉल व डोंगर रांगेनेच हार परिधान केला आहे, असा वाटणारा नेकलेस फॉल, सादंनदरीचा रिव्हस धबधबा तर पांजरे येथील पांजरे फॉल, पांजऱ्याचच वैशाली उर्फ नायगारा धबधबा पर्यटकांना आपल्या कुशीत घेण्यासाठी खुणावु लागला आहे. अर्थात या सर्व धबधब्यांची सफर आनंददायी व्हावी यासाठी कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याची वन्यजीव शाखा वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्या अधिपत्याखाली काम करत आहे.