अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत. या देवदूतामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे.

या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळे या मुलीचे शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. जान्हवी शशिकांत वाबळे असं या मुलीचे नाव आहे.

सोनू सूद आमच्या कुटुंबासाठी देवदूतासारखे धावून आले. अशी भावना वाबळे कुटुंबाने व्यक्त केली आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील वाबळे वस्तीवर ११ वर्षीय जान्हवी वाबळे हि आपल्या कुटुंबासोबत रहाते, तिचे लहानपणापासून पाठीत कुबड निघाल्याने तिला अपंगत्व आले होते.

मात्र, अभिनेता सोनू सुदने तिच्या उपचारासाठी मोठी आर्थिक मदत केली, पुण्यात एका रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हि शस्रक्रियाही यशस्वी झाली आहे.

जान्हवीची प्रकृती आता सुधारली असून तिचे अपंगत्व पूर्णपणे गेले आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये सोनू सूद शिर्डीला साई दर्शनाला आला होता, त्यावेळी त्याने शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच गरजवंतांना वैद्यकीय मदत करण्याची भावना व्यक्त केली होती.

सोनू सूद याचे कोपरगाव येथील मित्र सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांनी जान्हवीचे वडील शशिकांत वाबळे आणि सोनू यांची भेट घडवून आणली.

यावेळी वाबळे यांनी सोनू सूदला सर्व परिस्थिती सांगितली. त्याने जाह्नवीच्या वडिलांची व्यथा ऐकून घेतली व त्यांना शस्रक्रियेसाठी आर्थिक मदत ही केली.

डिसेंबरमध्ये पुण्यातील एका रुग्णालयात जान्हवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. जान्हवीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तिच्या आई-वडिलांनी सोनू सुदचे आभार मानले आहेत.