महाविकास आघाडी सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले; विखे पाटलांची टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :- सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करून शेतकऱ्याच्या नुकसानीचीही थट्टा केली.

संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने याचा जबाब द्यावा, केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतजमिनींची धूप झाल्याने जमिनी नापीक झाल्या असल्याने, शेतकऱ्याच्या पुढच्या दहा वर्षांच्या उत्पन्नाचे मार्गसंपुष्टात आले आहेत.

असे प्रतिपादन आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेत जमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत.

महाविकास आघाडी सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले असल्याची टिका त्यांनी केली. तसेच या सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला आहे.

सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. भेसळयुक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच नागविला गेला असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यानंतरही सरकार गप्प बसण्याची भूमिका म्हणजे शेतकरी त्रस्त आणि सरकार मस्तवालपणे वागत असल्याचा आरोप आ.विखे यांनी केला.