आनंदाची बातमी : पावसाचा जोर वाढला ! भंडारदऱ्यात पुन्हा पावसाचे आगमन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचे गुरुवार दुपारपासून भंडारदरा पाणलोटात पुन्हा आगमन झाले असून घाटघर व रतनवाडीमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाली आहे.

जून महिन्याच्या अखेरीस भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती.

आता मात्र विश्रांतीनंतर भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात काल बुधवारी पुन्हा पावसाचे बरसने सुरू झाले आहे. गुरूवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला असुन शुक्रवारी त्याचे मोठ्या पावसात रुपांतर झाले.

गत चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली असली, तरी ती विश्रांती आदिवासी शेतकरी बांधवांच्या भात पिकांसाठी लाभदायक होती. सतत आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने भात रोपांना याचा फटका बसल्याने ती दगावण्याची शक्यता निर्माण झाली होती.

आता मात्र भात रोपे तरारलेली दिसुन येत आहेत. चार ते पाच दिवसांच्या विश्रांतीमुळे भंडारदरा धरणाच्या पाण्याची आवकही मंदावलेली दिसुन आली. गेल्या २४ तासात भंडारदरा येथे ६१ मीमी पावसाची नोंद झाली.

पावसाचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी १२० मीमी पाऊस पडला, तर रतनवाडी ११० मीमी, पांजरे ८५ मीमी व वाकी येथे ५१ मीमी पावसाची नोंद झाली. ११०३९ दलघफु क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६०३८ दलघफु झाला असुन धरण ५४. ७०% भरले आहे.

भंडारदरा धरणात गत २४ तासात ३५ दशलक्ष घनफूट नविन पाणी आले आहे. विजनिर्माण केंद्रातुन ८४० क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीत वाहत आहे. वाकी धरणाचा पाणीसाठा हा ७०.७९ दशलक्ष घनफूट झाला असुन वाकी धरणही ६२% भरले आहे.