‘अमृत’ चे काम रखडले; माजी महापौर सर्वसाधारण सभेत संतापले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणार्‍या अमृत योजनेचे काम रखडल्याने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला याचा जाब विचारला.

अमृत योजना का रखडली, पाण्यासाठी शहरवासियांना का वेठीस धरता अशी विचारणा करत ही योजना कधी मार्गी लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावर पाणीपुरवठा विभागाने योजनेचे काम अंतीम टप्यात असून येत्या तीन महिन्यांत काम मार्गी लागेल, असे सांगितले. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व काही नगरसेवक उपस्थित होते. उर्वरित अधिकारी, नगरसवेक या सभेत ऑनलाईन सहभागी झाले होते.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी अडचणीचा ठरणारा 18 मीटर रूंदीचा प्रस्तावित डिपी रस्ता वगळ्याचा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला मात्र काही नगरसेवकांनी याला तीव्र विरोध दर्शविल्याने या विषयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.

प्रत्यक्ष पाहणी करूनच या विषयावर निर्णय घेण्यात येईल, असे महापौर शेंडगे यांनी सभेत स्पष्ट केले. 18 मीटर ऐवजी नऊ मीटर का असेना पण रस्ता कायम ठेववा, अशी मागणी वाकळे यांनी केली.

सेनेचे नगरसेवक गणेश कवडे यांनी रहिवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सदरचा रस्ता बारा मीटर ठेवावा, अशी मागणी केली. या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून हा विषय पुढील सभेत घेतला जाईल, असे यावेळी महापौर शेंडगे यांनी सांगितल्याने हा विषय स्थगित ठेवण्यात आला.

महानगरपालिकेकडे अडीच हजार मोकळे भुखंड आहेत. यातील तेराशे भुखंडांवर महापालिकेचे नाव नाही. कुणीही मागणी केली तरी भुखंड देतात.

या जागांवर गाळे बांधून महापालिकेचे उत्पादन वाढवा. असे सांगत सर्व भुखंडांची आयुक्तांनी पाहणी करावी, अशी मागणी नगरसेवक अनिल शिंदे यांनी केली.